Hatnur Dam Earthquake
जळगाव : नरेंद्र पाटील
मध्य प्रदेशातील खरगोन येथे झालेल्या ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के आज सकाळी हतनूर धरण परिसरासह जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांत जाणवले. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या हतनूर धरणावर स्वतंत्र भूकंपमापक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे. धरणासारख्या मोठ्या प्रकल्पावर भूकंपाची तीव्रता मोजणारी यंत्रणाच नसल्याने जलसंपदा विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर असलेल्या हतनूर धरणावर भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आणि अमळनेर या सहा तालुक्यांतील सुमारे ४० हजार हेक्टर शेतीचे सिंचन, पिण्याचे पाणी आणि दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे भवितव्य अवलंबून आहे. धरण परिसरात आज सकाळी ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज होऊन सौम्य हादरे बसले. या धक्क्यांमुळे लगतच्या गावांतील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.
हतनूर धरण परिसर हा सातपुड्याच्या पायथ्याशी असून, मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागाला लागून आहे. मात्र, धरणावर स्वतःचे भूकंपमापक यंत्र नसल्याने धक्का नेमका किती तीव्रतेचा होता, याचा अधिकृत तपशील धरण प्रशासनाकडे उपलब्ध नसतो. परिणामी, प्रत्येक वेळी नाशिक येथील 'नेरी' संस्थेच्या नोंदींवर किंवा 'व्होल्कॅनो डिस्कव्हरी'सारख्या खासगी आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर अवलंबून राहण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
धरणाची भिंत आणि दरवाजांवर भूकंपाच्या लहरींचा नेमका काय परिणाम होतो, हे तांत्रिकदृष्ट्या तपासण्यासाठी 'सिस्मोग्राफ' यंत्रणा अत्यावश्यक असते. विशेषतः हतनूर धरणात आधीच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असताना, अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात अचूक नोंदी नसणे धोक्याचे ठरू शकते. यापूर्वीही परिसरात सौम्य धक्के जाणवले आहेत; तरीही जलसंपदा विभागाने याकडे दुर्लक्ष का केले, असा संतप्त सवाल तापी काठावरील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
भूकंपाचे केंद्रबिंदू जरी मध्य प्रदेशातील खरगोन असले, तरी त्याच्या लहरी सातपुडा पर्वतरांगांतून थेट हतनूर धरण क्षेत्रापर्यंत पोहोचल्या. मोठ्या धरणांवर भूकंपमापक यंत्रणा असणे अपेक्षित असताना हतनूर प्रकल्पावर ती अद्याप बसवलेली नाही. तापी काठावरील लाखो नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून शासनाने तातडीने हतनूर धरणावर आधुनिक भूकंपमापक यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.
हातनुर धरणावर भूकंपमापक केंद्र आहे. मात्र त्यातून कोणतीही माहिती मिळत नाही. यासाठी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे.एम एल पाटील (अभियंता, हातनूर धरण)
हातनूर धरणावर मेरी संस्थेने भूकंप तीव्रता मोजण्यासाठी भूकंप मापक यंत्र बसवले होते. मात्र ते अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. त्यासाठी तेथे यंत्र ठेवण्यासाठी खोली सुद्धा आहे. मात्र अनेक वर्षांपासून यंत्रणा नादुरुस्त असल्याने तेथून कोणताही डाटा हातनूर धरणाला किंवा संबंधित निरी संस्थेला मिळत नाही. सदरची यंत्र दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.