अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातून चोरीस गेलेली कार जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून जप्त केली  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | गुजरातमधून चोरीस गेलेली ९ लाखांची कार जळगावात जप्त; पाठलाग करून चालकाला घेतले ताब्यात

अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किंमतीची कार जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून जप्त केली

पुढारी वृत्तसेवा

Gujarat Stolen Car Seized

जळगाव : गुजरातमधील अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किंमतीची किया कॅरेन्स कार जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून जप्त केली. या कारवाईत वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातील बोपल पोलीस ठाण्यात १५ एप्रिल २०२६ रोजी किया कॅरेन्स (क्रमांक एमपी ०४ झेडएल ५१५५) चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, १८ जून रोजी सायंकाळी सदर वाहन नशिराबाद टोलनाका पार करून जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती बोपल पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील पोहेकॉ संदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांनी काशीनाथ चौक परिसरात नाकाबंदी केली. संशयित वाहन तेथे आल्यानंतर पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने अजिंठा चौफुलीच्या दिशेने पळ काढला.

पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत अजिंठा चौफुली येथील हिरो होंडा शोरूमसमोर वाहन अडविले. प्राथमिक चौकशीत हे वाहन गुजरातमधील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

घटनेची माहिती बोपल पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार १९ जून रोजी गुजरात पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९ लाख रुपये किंमतीची किया कॅरेन्स कार आणि चालक यांना बोपल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ संदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांनी ही यशस्वी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT