जळगाव : नरेंद्र पाटील
न्यायालयाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत की, महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहे. मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर पाहता, हे प्रत्यक्षात शक्य होईल का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेषतः अजित पवार गट व शिंदे गट यांच्यातील वाढणारे तणावपूर्ण नाती, तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची झळ, हे चित्र अधिकच गुंतागुंतीचं बनवत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गट सोडून गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर ते थेट महायुतीच्या व्यासपीठावर दिसू लागले. त्यामुळे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील नाराज असून, त्यांनी बंडखोरीची भूमिका स्वीकारत थेट "भ्रष्टाचार उघड करणार" असे विधान केले आहे.
एरंडोल व जळगाव ग्रामीण मतदारसंघांत शरद पवार गट आणि शिंदे गट यांच्यात झालेली थेट टक्कर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्यावर "खोक्याचे" आरोपही झाले. आता हेच दोन गट पुन्हा एकत्र येणार का, हे मोठं कोडं निर्माण झालं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय हालचालींमुळे पक्षांतराचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट या तिघांत सत्ताकेंद्रित हालचाली झपाट्याने घडल्या. यात माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि डॉ. सतीश अण्णा पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे या गटाचे पक्षीय बलाबल वाढल्याचे चित्र आहे, तरीही जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व अजूनही अबाधित आहे.
निवडणुका जवळ येत असताना गुलाबराव देवकर व गुलाबराव पाटील यांच्यातील उघड वाद लक्ष वेधून घेत आहे. धरणगाव नगरपालिका, नशिराबाद नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी देवकर समर्थक तिकीट मागणार असल्याने यातून नव्या वादाची शक्यता निर्माण होत आहे.
महायुतीतील शीर्ष नेतृत्व (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) एकत्र असल्याचे दाखवत असले तरी जळगावच्या पातळीवर तेच सहकार्य जमेल, हे अवघडच आहे. देवकर व पाटील यांच्यातील तणाव आणि विश्वासाचा अभाव लक्षात घेता, देवकरांना या निवडणुकीत दुय्यम स्थान स्वीकारावं लागू शकतं.
एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होण्याची चिन्हं आहेत. यावेळी शरद पवार गट नसून अजित पवार गट मैदानात असेल. मात्र शिंदे आणि अजित पवार गटांमध्ये सौहार्द जुळेल का? हाही एक मोठा प्रश्न आहे. एकूणच, मुख्यमंत्री जरी म्हणत असले की महायुती एकत्र लढणार, तरीही जळगाव जिल्ह्याच्या पातळीवर ते घडणं सध्या तरी अशक्यच वाटत आहे.