Girna Dam 
जळगाव

Girna Dam : गिरणा तुडुंब! नदीकाठच्या गावांना 'हाय अलर्ट'

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजेच्या नोंदीनुसार, गिरणा धरणात २० हजार ४४३ दशलक्ष घनफूट (९४.२९ टक्के) इतका साठा झाला आहे. मुंबई हवामान वेधशाळेने ३० आणि ३१ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने धरणाची सुरक्षितता लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पुराचे पाणी गिरणा नदीपात्रात सोडले जाण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाकडून 'हाय अलर्ट' जारी!

चाळीसगाव पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता विजय प्र. जाधव यांनी याबाबत अधिकृत पूर्वसूचना जारी केली आहे. धरणात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असून लवकरच गिरणा धरण १०० टक्के भरणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतात किंवा नदी परिसरात वास्तव्यास असलेल्या वस्त्यांनी पूर्णपणे सतर्क राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन

पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी, पर्यटकांनी किंवा गुराढोरांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, असा कडक इशारा देण्यात आला आहे. तसेच, नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी आपल्या चीजवस्तू आणि पशुधनाची तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

धरणातील पाण्याची आवक पाहता पूर नियंत्रणासाठी द्वारपरीचलन (दरवाजे उघडणे) करून विसर्ग सुरू केला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
विजय प्र. जाधव (उपविभागीय अभियंता, चाळीसगाव)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT