जळगाव: "त्यावेळी खडसे साहेब आमचे नेते होते, पण मी इतका संतापलो होतो की त्यांनाही 'अजिबात बोलायचे नाही' असं ठणकावून सांगितलं होतं. कोणाचंही ऐकायला मी तयार नव्हतो," अशा शब्दांत राज्याचे संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचं. जळगावात आयोजित शोकसभेत बोलताना महाजन यांनी २००२ मधील तो ऐतिहासिक संघर्ष आणि दादांसोबतची मैत्री यावर भाष्य केलं.
आमदारांच्या अधिकारासाठी दादांशी 'पंगा'
२००२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद आमदारांऐवजी पालकमंत्र्यांकडे देण्याचा निर्णय अजित दादांनी घेतला होता. या निर्णयामुळे आमदारांचे अधिकार हिरावले जात असल्याच्या भावनेतून गिरीश महाजन पेटून उठले होते. "आम्हाला काही अधिकार आहेत की नाही?" असा सवाल करत त्यांनी सभागृहात रान पेटवलं होतं.
दादांचं बजेट भाषण टीव्हीवर दिसू दिलं नाही!
हा संघर्ष इतका टोकाला गेला होता की, ज्या दिवशी अजित दादा अर्थसंकल्प मांडणार होते, त्या दिवशी गिरीश महाजन यांनी थेट दादांच्या समोरच बॅनर धरला. "मी असा बॅनर धरला होता की दादांचे तोंड आणि त्यांचे भाषण टीव्हीवर दिसणार नाही. यामुळे दादा प्रचंड संतापले होते," असं महाजन यांनी सांगितलं.
जेव्हा नेत्यालाच झापलं...
या आंदोलनावेळी भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी महाजन यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. "खडसे साहेब मला 'खाली बस, खाली बस' असं ओरडत होते. पण मी इतका चिडलो होतो की त्यांनाही 'अजिबात बोलायचे नाही' असं सुनावलं. मी कोणाचंच, अगदी मुंडे साहेबांचंही ऐकलं नाही," अशी आठवण महाजन यांनी सांगितली.
धमकी ते घनिष्ठ मैत्रीचा प्रवास
या प्रकरणानंतर अजित दादांनी महाजन यांना "पाच वर्षे एक रुपयाही निधी देणार नाही, तुला बघून घेईन," असा इशारा दिला होता. मात्र, वर्ष-दोन वर्षांच्या तणावानंतर दोघांमध्ये अशी काही मैत्री जमली की ती अखेरपर्यंत टिकली. "दादांसारखा दिलदार नेता पुन्हा होणे नाही, त्यांनी शब्दांत कधीच आढेवेढे घेतले नाहीत," अशा भावूक शब्दांत महाजन यांनी श्रद्धांजली अर्पण केली.