जळगाव

Girish Mahajan vs Rohit Pawar : रोहित पवारांना ‘मीडिया फोबिया’, कुंभमेळ्याला बदनाम करू नका; मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "रोहित पवारांना मीडिया फोबिया झाला असून ते निव्वळ प्रसिद्धीसाठी असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी कुंभमेळा आणि पर्यायाने हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये," असा सज्जड इशारा महाजन यांनी दिला. आपल्या ३५ ते ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नाशिकमधील टेंडर प्रक्रियेइतकी पारदर्शक प्रक्रिया कधीच पाहिली नाही, असा दावा करत त्यांनी रोहित पवारांनी केवळ हवेत गप्पा न मारता अधिकृत कागदपत्रांसह आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे थेट आव्हान दिले. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी या प्रकरणासह राज्यातील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सरकार आणि पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली.

राज्यात चर्चेत असलेल्या बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री महाजन यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. निष्पाप रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. बिहार आणि उत्तर प्रदेशमधून बनावट पदव्या आणल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असून, या सर्व तक्रारींची राज्य सरकारमार्फत अत्यंत सखोल चौकशी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्या पुत्रांना ईडीकडून मिळालेल्या दिलाशावर विचारले असता महाजन यांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट आणि तांत्रिक स्वरूपाचा आहे. ईडी ही एक स्वायत्त यंत्रणा असून ती मुख्यमंत्र्यांच्या किंवा सरकारच्या अखत्यारीत काम करत नाही. संबंधित प्रकरणात ठोस पुरावे हाती लागले नसतील, म्हणूनच तपास यंत्रणेने तसा अहवाल सादर केला असावा; यंत्रणा केवळ नियमांनुसारच आपले काम करते, असे त्यांनी नमूद केले.

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) कंपनीशी संबंधित लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रकरणावरही महाजन यांनी कडक शब्दांत भाष्य केले. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्याचे सांगत सरकारने यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. चौकशीतून जे सत्य समोर येईल त्यानुसारच कारवाई पुढे सुरू राहील, यात आमचे मित्र इम्तियाज जलील जरी दोषी आढळले तरी त्यांच्यावरही निःपक्षपातीपणे कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

स्थानिक व प्रादेशिक राजकारणावर भाष्य करताना, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्ष पूर्ण एकजुटीने आणि ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा अर्ज बाद ठरण्यामागे कोणताही राजकीय कट किंवा ‘अदृश्य शक्ती’ नसल्याचे सांगत हा प्रशासकीय व तांत्रिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याविरोधात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली असून तिथे नियमानुसार योग्य तो निर्णय होईल, यात आपला कोणताही संबंध नाही, असा खुलासा त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली असता, प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांची घेतलेली भेट कॅमेऱ्यासमोर झाली की बंद दाराआड, याची आपल्याला कल्पना नसल्याचे महाजन म्हणाले. पवार साहेब सध्या रुग्णालयात उपचार घेत असून ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, हीच आमची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी, ऊस दराबाबत सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या परस्पर समन्वयातून यशस्वीपणे मिटल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सोलापूरमधील भाजप आणि काँग्रेसमधील वादावर बोलताना त्यांनी सत्तेत आणि विरोधात असणाऱ्यांची विचारसरणी भिन्न असल्याने असे वाद स्वाभाविक असल्याचे सांगितले. तर बीडमधील तरुणाच्या मृत्यूच्या घटनेबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT