Ganja lagwad File Photo
जळगाव

शेतात गांजाची लागवड प्रकरणी एकाला अटक ; ९३ झाडांसह १.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रावेर तालुक्यातील सावदा परिसरात बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सावदा पोलीसांनी धाडसी कारवाई करत शेतातून मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ९४ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांनी अवैध अंमली पदार्थांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश रमेश पाटील उर्फ पिंटू (वय ४४, रा. प्लॉट एरिया, सावदा ता. रावेर जि. जळगाव) याने सावदा शिवारातील शेत गट क्रमांक ४६३ मध्ये हरभरा पिकाच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केली होती. कोणतीही शासकीय परवानगी न घेता या शेतात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर सावदा पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्काळ कारवाई केली.

१० मार्च २०२६ रोजी सायंकाळी पोलीसांनी छापा टाकत शेतातून ९३ कॅनाबीस (गांजा) झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन सुमारे २८ किलो ५४० ग्रॅम इतके असून त्यांची अंदाजे बाजार किंमत १ लाख ९४ हजार ७२ रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ६१/२०२६ अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८ (क) व २० (ब) (II) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेश पाटील यास पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल शिवाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार निलेश बाविस्कर, संजीव चौधरी, राजेंद्र वैदकर, उमेश पाटील, सुनील सैंदाणे, बबन तडवी, मनोज तडवी तसेच होमगार्ड पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

या कारवाईस पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रावेरचे नायब तहसीलदार, सहाय्यक कृषी अधिकारी आणि तलाठी रशीद तडवी, सावदा यांनी पंचनामा प्रक्रियेत सहकार्य केले.

या घटनेमुळे परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलीस अधिक सतर्क झाले असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT