भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा (वेल्हाळे) येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे एक अतिप्राचीन आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत प्राचीन शिवमंदिर आहे.  Pudhari News Network
जळगाव

श्रावण पहिला सोमवार : एक हजार वर्षांची उज्वल परंपरा असलेले वेल्हाळ्याचे श्री कपिलेश्वर महादेव मंदिर सजले

जळगाव : वेल्हाळा येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर — 1000 वर्षांची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा

पुढारी वृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : नरेंद्र पाटील

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा (वेल्हाळे) येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे एक अतिप्राचीन आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत प्राचीन शिवमंदिर आहे. सुमारे 950 ते 1000 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराची स्थापत्यशैली ही हेमाडपंती असून, ते यादवकालीन कालखंडातील मानले जाते. हे मंदिर श्री कपिल ऋषींच्या जन्मभूमीशी जोडले गेले आहे, त्यामुळे हे मंदिर "कपिलेश्वर" या नावाने ओळखले जाते.

प्राचीन इतिहास आणि धार्मिक पौराणिकता

कपिलेश्वर मंदिर हे यादवकालीन अथवा त्याही पूर्वीचे असल्याचे स्थानिक आणि पुरातत्त्वीय अभ्यासक मानतात. संपूर्ण दगडी रचनेत कोरलेले हे मंदिर सुमारे 950 ते 1000 वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. मंदिराचे नाव कपिल ऋषींशी जोडले गेले असून, हे त्यांचे जन्मस्थान असल्याची श्रद्धा आहे. कपिल ऋषी हे सांख्य दर्शनाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.

श्रावण मासारंभ झाल्याने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आरतीमध्ये देखील मंदिराच्या या गावाचे महत्त्व अधोरेखित होते

“कर्पूर गौरा भोळा नयनी विशाल |

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |

विभूतीचे उधळण, शेती कंठ निळा |

ऐसा शंकर शोभे, उमा वेल्हाळा”

मंदिरातचे स्थापत्य वैशिष्ट्ये अशी...

हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले असून, काळ्या दगडातील कोरीव काम, विशिष्ट जोडणी आणि शिल्पकलेमुळे हे स्थापत्यदृष्ट्या अनमोल ठरते. मंदिराच्या भिंती व परिसरातील शिल्पकाम पाहण्यासारखे असून, शांत, निसर्गरम्य वातावरण भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते.

संपूर्ण दगडी रचनेत कोरलेले कपालेश्वर मंदिर सुमारे 950 ते 1000 वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.

मंदिरात श्री उमा-महेश्वर म्हणजेच शिव-पार्वती यांचे पूजन होते. येथील शिवलिंग पवित्र मानले जात असून श्रावणात मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागतात. श्रावण महिन्यातच्या सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक, जागरण यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. पितृपक्षात तर्पण व श्राद्धासाठी येथील घाट विशेष मानला जातो.

येथे असलेल्या महादेवाची पिंडीबद्दल स्थानिक भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारची महादेवाची पिंड इतरत्र कुठेही नसून ही श्रावणीय यात्रेदरम्यान पिंडीची विशेष पूजा केली जाते.

कपालेश्वर मंदिरातील महादेवाची पिंड.

मंदिर दर्शनासाठी असे जा...

कपिलेश्वर मंदिर हे भुसावळ रेल्वे स्थानकापासून अवघ्या १०-१५ किमीवर असल्याने रस्ते आणि रेल्वेमार्गे सहज पोहोचता येते. तापी नदीजवळ वसलेले हे मंदिर निसर्गाच्या कुशीत असल्याने येथे येणाऱ्यांना अध्यात्मिक शांती लाभते.

श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने पिंडीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे,

सध्याची स्थिती आणि जीर्णोद्धार

स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांच्या सहकार्याने मंदिराची देखभाल नियमित केली जात आहे. श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, वेल्हाळा यांच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या उपक्रमात गावकरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हेमाडपंती शैलीतील इतर प्रसिद्ध मंदिरे अशी...

  • गोंदेश्वर मंदिर, सिन्नर (नाशिक) – यादवकालीन काळातील उत्कृष्ट शिल्पकला

  • अमरनाथ मंदिर, अंबड (जालना) – अद्वितीय रचना व शिल्प

  • भुलेश्वर मंदिर, पुणे – पुणेजवळील प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्य

श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे केवळ धार्मिक आणि भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण असून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व स्थापत्य परंपरेचा अनमोल ठेवा आहे. या मंदिराचा इतिहास, भक्तिभाव, आणि ग्रामस्थांनी दिलेले योगदानासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT