जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क | चाळीसगाव शहरामधील मिरची बाजाराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार (दि.11) रोजी दुपारी लागली. या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. आग लागलेल्या घटनेच्या शेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
चाळीसगाव शहरातील नागद रोडरील मिरची बाजार आहे. मिरची बाजाराला शुक्रवार (दि.11) रोजी दुपारी भीषण आग लागली. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीसह इतर शेतमालाचा साठा करण्यात आलेला आहे. मात्र सर्व साठा आगीत सापड्याने जळून खाक झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या आगीत 12 दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाले आहे. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत सुरु आहे.