हद्दपार / तडीपार 
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील 'तळीरामां'वर मोठी कारवाई; फत्तेपूरमधून १ वर्षासाठी हद्दपार

अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : आगामी सण-उत्सव आणि २०२६ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारांविरुद्ध कंबर कसली आहे. पाचोरा उपविभागातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन अट्टल गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्याच्या सीमांतून एक वर्षासाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुनील पांडुरंग पारधी आणि विजय पांडुरंग पारधी (दोघे रा. फत्तेपूर, ता. जामनेर) अशी या तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

कायद्याचा वचक अन् सामाजिक शांतता मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पारधी आणि विजय पारधी या दोघांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात अवैध रित्या दारू गाळणे आणि ती जवळ बाळगण्याप्रकरणी वारंवार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता आणि सामाजिक सुव्यवस्था धोक्यात आली होती. या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी (जळगाव भाग) यांच्याकडे सादर केला होता.

' उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर कठोर पाऊल उचलले आहे. २०२६ च्या निवडणुका आणि येणारे सण निर्भय वातावरणात पार पडावेत, सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये आणि संबंधित इसमांकडून पुन्हा अवैध दारू विक्रीचे कृत्य घडू नये, यासाठी या दोघांना १ वर्षाकरिता जळगाव जिल्हा सरहद्दीतून बाहेर काढण्याचे आदेश पारित केले आहेत.

सदर धडाकेबाज कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर (पवार) यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम आणि फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT