Marriage scam File Photo
जळगाव

Marriage scam: अडीच लाख देऊन नवरी आणली; लग्नानंतर तिसऱ्या दिवशी सासरच्यांच्या जेवणात विष कालवून पळाली

मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाखांची बोली लावून परराज्यातून आणलेली नवरी अवघ्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबाच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Marriage scam

जळगाव: मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाखांची बोली लावून परराज्यातून आणलेली नवरी अवघ्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबाच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला आहे. जेवणात उंदीर मारण्याचे विषारी औषध कालवून पतीच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचणाऱ्या आणि ऐवजासह पोबारा करणाऱ्या दोन तरुणींना पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत धुळे सीमेवरून बेड्या ठोकल्या. या विषबाधेमुळे नवरदेवाचे आई-वडील अत्यवस्थ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेल्हाणे (ता. पारोळा) येथील वाल्मिक ताराचंद पाटील (वय ३२) या तरुणाचे लग्न जमवण्यासाठी एका दलालामार्फत अडीच लाख रुपयांची बोली ठरवून झारखंड किंवा छत्तीसगड भागातून दोन मुली आणण्यात आल्या होत्या. त्यानुसार ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी हिच्यासोबत वाल्मिकचा विवाह गावातच पार पडला. मात्र, हा विवाह म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले.

जेवणात कालवले उंदीर मारण्याचे औषध

लग्नाला तीन दिवस उलटत नाहीत तोच, ९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास सुमन सहाणी व तिची साथीदार आरती सूर्यप्रकाश पटेल यांनी संगनमत केले. त्यांनी फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील व आई सरलाबाई पाटील यांना जेवणातून उंदीर मारण्याचे विषारी औषध देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंब बेशुद्धावस्थेत जाताच घरातील पैसे घेऊन दोघींनी १० ऑक्टोबर रोजी सकाळी गावातून पळ काढला. जेवणानंतर विषबाधा झाल्याचे लक्षात येताच ताराचंद पाटील व सरलाबाई पाटील यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल रुग्णालयात) दाखल करण्यात आले.

पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; धुळे हद्दीत मुसक्या आवळल्या

दरम्यान, वेल्हाणे येथील पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती तत्काळ पारोळा पोलिसांना दिली. माहिती मिळताच बिट अंमलदार पोलीस हवालदार सुनील हाटकर, पोलीस शिपाई गवळी व पोलीस शिपाई शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी महिला धुळे जिल्ह्याच्या दिशेने पसार झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला. गोपनीय माहितीच्या आधार घेऊन पाठलाग करत अंमलदारांनी धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर या दोन्ही महिलांना शिताफीने ताब्यात घेतले.

या प्रकरणी गणेश ताराचंद पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात सुमन सुभाष सहाणी व आरती सूर्यप्रकाश पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आंतरराज्यीय टोळीचा सूत्रधार असलेला दलाल कोण, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT