जळगाव : "राज्य सरकारकडून १०० टक्के योजना लोकांसाठी राबवल्या जात आहेत. गरिबांचे राहणीमान उंचावण्यासाठी राज्य व केंद्र सरकार कटीबद्ध आहे. मात्र, ५० योजना झाल्यानंतरही पत्रकार एकाच मुद्द्यावर अडकतात," असा टोला राज्याचे माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारल्यावर महाजन यांनी थेट उत्तर देणे टाळत सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही सुरू आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. योजना राबविण्यास वेळ लागतो. कर्जमाफी होत नाही या मानसिकतेतून बाहेर पडावे, योजनांचा प्रभाव समजून घ्यावा."
महाजन म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुकांत महायुती एकत्र लढणार आहे. काही ठिकाणी अपवाद असतील, तर त्यावर विचार केला जाईल.
"देशात वैद्यकीय हब नाही, मात्र जळगावमध्ये हे स्वप्न साकारत आहे. तसेच २५० कोटींचे क्रीडांगण उभे राहत आहे," असे त्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांची कामे वेगाने सुरू असून, येत्या चार महिन्यांत पूर्ण होतील. तीन मोठ्या पुलांमुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. मुख्यमंत्री एकूण १०० कोटींचा निधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जामनेर येथील टेक्स्टाईल पार्कबाबत बोलताना महाजन म्हणाले की, "पार्कमध्ये पाणी व जमीन महाग असल्याने उद्योजक अडचणीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जमीन दर ५० टक्क्यांनी कमी केले आहेत. तसेच इलेक्ट्रिक, जीएसटी आणि इतर सवलतीही देण्यात येणार आहेत. कोका कोला, रेमंड, बॉम्बे वेअर यांसारख्या कंपन्यांनी पाहणी केली असून, एक-दोन महिन्यांत कामे सुरू होतील."
श्रावण बाळ योजना व निराधार योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी वेळेवर मिळतो. मात्र, काही वेळा दोन महिन्यांचा उशीर होतो. यावर ‘समाधान शिबिरे’ घेऊन नागरिकांच्या केवायसी व इतर अडचणी दूर केल्याचे त्यांनी सांगितले.
"भाजपवर लोकांचा विश्वास आहे. कारण, विरोधकांकडे विश्वसनीय नेतृत्व नाही. पळून गेलेल्यांना उमेदवारी मिळेल का, यावर अद्याप निर्णय झालेला नाही," असे सांगून महाजन यांनी त्या प्रश्नालाही बगल दिली.