जळगाव : नुसतं गप्पा मारायचे नाही, पोकळ आश्वासन नाही. नुसते काम करायचे आणि त्या ठिकाणी परिवर्तन घडवायचे. परिवर्तनाची नांदी घडवायला आणि टिकवायला विश्वास पाहिजे आणि विश्वासाचे चिन्ह हे धनुष्यबाण आहे. मी कमिटमेंट करत नाही, परमनंट काम करतो कारण माझा दृष्टिकोन फक्त डेव्हलपमेंट करण्याचा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरच्या सभेमध्ये केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षासह 17 नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्व उमेदवारांची नावे वाचून मतदानाचा आव्हान केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महिलाराज येणार आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आलेले आहेत. लाडक्या बहिणी व लाडक्या भावांना भेटण्यासाठी व आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे.
मुक्ताईनगरच्या विकासाची पालखी शिवसेनेच्या खांद्यावर द्या. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना पाटील ही माझी लाडकी भाची आहे. मी तिचा मामा आहे. माझ्या भाचीला मदत करा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री असताना मी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि कोणी माईचा लाल तिला बंद करू शकणार नाही. बहिणींना फक्त पंधराशे रुपये ठेवणार नाही तर बचत गटाच्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय उभा करण्यास मदत करणार, बहिणींना लखपती करण्यास मदत करणार असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.