जळगाव : जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक ‘दगडी बँक’ विक्रीस काढण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यांनी जारी केलेल्या पत्रकात बँकेतील कर्मचाऱ्यांची होणारी भरती पारदर्शक एजन्सीमार्फतच व्हावी, यावरही भर दिला आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी बुधवार (दि.1) रोजी पत्रकार परिषदेत, यापूर्वी विविध सहकारी संस्था विक्रीस काढल्या गेल्या तेव्हा विरोध झाला नव्हता, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आमदार खडसे यांनी प्रत्युत्तर देताना, दगडी बँकेची इमारत ही बँकेची स्वतःची मालमत्ता असून तिची बाजारातील किंमत किमान ६५ कोटी रुपये इतकी आहे. त्या इमारतीवर कोणतेही कर्ज नसताना विक्रीचा निर्णय घेण्याचा अधिकार संचालक मंडळाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
खडसे म्हणाले, पूर्वजांनी कमावलेली मालमत्ता विकणे हा चुकीचा निर्णय आहे. दगडी बँक ही केवळ इमारत नाही, तर ती बँकेची ओळख आणि वारसा आहे. लाखो शेतकरी आणि खातेदार या वास्तूसोबत भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत.
भरती प्रक्रियेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने जिल्हा बँकेतील 220 जागांच्या भरतीस मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र ही भरती IBPS सारख्या 100 टक्के पारदर्शक एजन्सीमार्फतच व्हावी. मागील वेळी अशाच प्रक्रियेद्वारे 250 पेक्षा जास्त भरती झाली असून एकाही तक्रारीचा प्रसंग आला नाही. आगामी 300 जागांसाठी होणारी भरतीही याच पद्धतीने व्हावी, अन्यथा शिफारस व वशिलेबाजीला स्थान दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, काही सचिवांकडून उमेदवारांकडून 20,000 रुपये मागितल्याच्या तक्रारी मिळाल्याचेही खडसे यांनी सांगितले. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दगडी बँक बचाव मोहीम उभारणार
खडसे म्हणाले, बँकेला सध्या दगडी बँक विक्री करण्याची आर्थिक निकड नाही. खरंच NPA कमी करायचे असतील, तर धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवडीवर काढलेले कर्ज वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करावे. विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘दगडी बँक बचाव मोहीम’ उभारण्यात येईल.