Eknath Khadse, Girish Mahajan Pudhari
जळगाव

Eknath Khadse : अपघाताने आमदार झालेल्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत; एकनाथ खडसेंचा टोला

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊससह हतनूर धरण आणि वरणगावच्या डिफेन्स फॅक्टरी परिसरात संशयित ड्रोनच्या फेऱ्या वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले

पुढारी वृत्तसेवा

Khadse Vs Mahajan Jalgaon Politics

जळगाव : माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊससह हतनूर धरण आणि वरणगावच्या डिफेन्स फॅक्टरी परिसरात संशयित ड्रोनच्या फेऱ्या वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या गंभीर सुरक्षेच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांकडून उडवली जाणारी खिल्ली आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर खडसेंनी मंगळवारी (दि.६) पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले. दुसरीकडे, या संशयित प्रकाराबाबत सावदा आणि वरणगाव पोलिसांना गेल्या महिन्यातच रीतसर तक्रार दिल्याची पुष्टी हतनूर धरणाचे अभियंता एम. एल. पाटील यांनी केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आता अधिकच वाढले आहे.

‘माझ्या प्रसिद्धीसाठी ड्रोन लागत नाही, गिरीश महाजनांनी भान ठेवावे!’

पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, "गोडसगाव, सावदा, निमखेडी मार्गे हतनूर धरण आणि थेट वरणगावच्या संवेदनशील डिफेन्स फॅक्टरीपर्यंत हा संशयित ड्रोन सलग घिरट्या घालत आहे. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत या ड्रोनचा माग काढला आहे. मात्र, जबाबदार जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन या अत्यंत संवेदनशील विषयावर अवाच्या सव्वा बोलून निव्वळ टिंगल उडवत आहेत. ज्यांना सुरक्षेचे गांभीर्य कळत नाही, अशा अकलेचा अभाव असलेल्या मंत्र्यांमुळे जिल्ह्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अपघाताने आमदार झालेल्यांनी ४५ वर्षे राजकारण करणाऱ्या खडसेंना प्रसिद्धीचे धडे शिकवू नयेत!"

हतनूर धरणाच्या अभियंत्यांचा खुलासा; पोलिसांना दिली होती तक्रार

या ड्रोन प्रकरणाला आता अधिकृत पुरावा मिळाला आहे. हतनूर धरणाचे अभियंता एम. एल. पाटील यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संशयित हालचाली जाणवल्यामुळे आम्ही गेल्याच महिन्यात सावदा व वरणगाव पोलिसांना लेखी तक्रार दिलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री तसेच दिवसाही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे."

गुप्तचर यंत्रणा कुचकामी; पोलिसांची झोप कधी उडणार?

संवेदनशील डिफेन्स फॅक्टरी आणि हतनूरसारख्या महाकाय धरणावर खुलेआम फिरणारा हा ड्रोन कुणाचा आहे? रात्रीच्या अंधारात अशा पद्धतीने रेकी कोणाच्या इशाऱ्यावरून आणि कोणत्या कटाचा भाग म्हणून सुरू आहे? सर्वसामान्य जनता आणि धरण अभियंत्यांना दिसणारा ड्रोन स्थानिक गुप्तचर यंत्रणेला का दिसत नाही, असा सडेतोड सवाल आता खडसेंनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी तात्काळ झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी खडसेंनी लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT