जळगाव : तालुक्यातील लमांजन गावात मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या मध्य प्रदेशातील एका तरुणाचा मंगळवार (दि. 14) रोजी गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार (दि.15) रोजी सकाळी सुमारे दहा वाजता त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. मृताचे नाव जयसिंग सुभाष बारेला (वय ४०, रा. शिरवेल, म.प्र.) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंग बारेला हे आपल्या कुटुंबासह मजुरीसाठी लमांजन येथे वास्तव्यास होते. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ते गिरणा नदीकाठी आंघोळीसाठी गेले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत ते परत न आल्याने त्यांच्या वृद्ध आई व बहिणीला संशय आला. त्यांनी शोध घेतला असता नदीकाठी जयसिंग यांचे कपडे व मोबाईल फोन आढळले. त्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती तत्काळ लमांजन येथील पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना देण्यात आली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. पुढील दिवशी सकाळी पुन्हा शोध घेतल्यावर गिरणा नदीच्या पात्रात जयसिंग बारेला यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे लमांजन गावात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.