Jalgaon Anti Corruption Bureau Action
जळगाव : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. पगार बिलावर कोणतीही त्रुटी न काढता सह्या करण्यासाठी आणि ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. जळगावमध्ये लाचखोरीविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक (वर्ग २) या पदावर शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी ते पगार बिलाच्या कामासाठी जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, जळगाव येथे गेले असता, माधुरी भागवत यांनी त्यांच्याकडे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर, पहिल्या हप्त्यापोटी ५ हजार रुपये आणि उर्वरित ५ हजार रुपये इतर बिले मंजूर झाल्यावर देण्याचे ठरले.
२४ जुलैरोजी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माधुरी भागवत यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, जीपीएसआय सुरेश पाटील, पोहेकाँ शैला धनगर, पोकाँ प्रणेश ठाकूर आणि पोकाँ सचिन चाटे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.