ATM Theft  Pudhari
जळगाव

एटीएम ‘कार्ड’बदलू गजाआड; जळगाव पोलिसांच्या जाळ्यात धुळ्याचा हातचलाख चोरटा

बेंडाळे चौकातील फसवणुकीचा पर्दाफाश; साथीदार सैय्यद खानवर मुंबईत १० गुन्हे; एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : बेंडाळे चौक परिसरातील एसबीआय एटीएममध्ये एका नागरिकाची फसवणूक झाली होती. भामट्यांनी हातचलाखी करून नागरिकाचे एटीएम कार्ड बदलले आणि २ लाख ३१ हजार रुपये लंपास केले. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी या आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक केली असून त्याला गजाआड केले आहे. या कारवाईमुळे एटीएम कार्ड बदलून पैसे चोरणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.

२६ मार्च रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर आरोपीने धुळे, नंदुरबार आणि मालेगाव येथील विविध एटीएममधून २ लाख ३१ हजार रुपये लंपास करत फसवणूक केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला भा.न्या.सं. कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या पथकासह तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धुळे येथे सापळा रचला आणि एटीएम कार्ड बदलून पैसे लांबविणाऱ्या शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

या टोळीतील दुसरा साथीदार सैय्यद कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा अद्याप फरार आहे. या आरोपीच्या नावावर मुंबई आणि नवी मुंबईतील कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी, कारपुबावडी अशा विविध पोलीस ठाण्यांत १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता या सराईत गुन्हेगाराचा कसून शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो.हे.कॉ. प्रविण मांडोळे, संदिप पाटील, हरिलाल पाटील, राहुल बैसाणे, पोलीस अंमलदार राहुल कोळी आणि विलास गायकवाड यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT