मुक्ताईनगर ( जळगाव ) : "हे सरकार वारकऱ्यांमुळे आणि माझ्या लाडक्या बहिणीमुळेच स्थापन झाले आहे," असे भावनिक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार (दि.6) मुक्ताईनगर येथे केले. नवीन मुक्ताई मंदिरातून पालखी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मुक्ताईच्या पालखी रथाचे सारथ्य करत भाविकांमध्ये समरस होऊन दर्शन घेतले. मंदिरात त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “वारकऱ्यांची सेवा करणे ही आपली जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित यंत्रणांची नियोजन बैठक झाली असून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्नानगृहे, शौचालये आणि आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.”
"ही संतांची भूमी आहे, वारकऱ्यांची भूमी आहे. आम्ही जरी राजकीय व्यक्ती असलो तरी धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठान आमच्यापेक्षा मोठे आहे. विठ्ठल नाम हेच आमचे प्रेरणास्थान आहे. संतांनी मानवतेच्या कल्याणाचा संदेश दिला आहे," असे उद्गारही शिंदे यांनी यावेळी काढले.
मुक्ताईबाबत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले की, "सर्वांची लाडकी बहीण मुक्ताई यांनी अभंगरूपाने ज्ञान दिले. लाडक्या बहिणींना लाडक्या भावाकडून वंदन. तापीच्या तीरापासून भीमा नदीपर्यंतचा हा पवित्र प्रवास आज सुरू झाला आहे. हा एक पवित्र क्षण आहे, सोन्याचा दिवस आहे."
"माझ्या बळीराजाला सुख-समृद्धी लाभो, महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होवो आणि सर्व वारकऱ्यांचा प्रवास सुखरूप आणि मंगलमय होवो." अशी भावपूर्ण प्रार्थना शिंदे यांनी केली. विठू नामाच्या जयघोषात त्यांनी सर्व भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.