जळगाव : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण चिघळू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू केली आहे.
या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा, मिरवणुका, शस्त्र बाळगणे, दाहक व स्फोटक पदार्थ ठेवणे, चित्रांचे दहन करणे, तसेच अशांतता पसरविणारे साहित्य तयार करणे किंवा प्रसारित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. ही जमावबंदी ३ मे रोजी पहाटे 1 वाजल्यापासून १६ मे रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत जिल्हा हद्दीत लागू राहणार आहे.
जिल्ह्यातील अलीकडील घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ८ मे ते १६ मे दरम्यान विविध सण, जयंती, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने जमावबंदी आवश्यक ठरल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशातून वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणास्तव लाठी अथवा सहाय्यक साधन वापरणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा व विवाह मिरवणुकांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.