जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाचा फटका आज थेट सामान्य नागरिक आणि अधिकाऱ्यांना बसला. ठेकेदाराने चक्क पार्किंगच्या जागेतच सिमेंटच्या गोण्यांचा खच टाकल्याने आणि दुसऱ्या बाजूला नालीचे काम सुरू असल्याने वाहन लावण्यास जागाच उरली नाही. याचा परिणाम असा झाला की, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात पायी चालत जावे लागले, तर दुसरीकडे रस्त्यात लावलेल्या सुमारे १०० वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडाचा बडगा उगारला. ठेकेदाराच्या चुकीची शिक्षा निष्पाप नागरिकांना भोगावी लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
आज सकाळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी नागरिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गाड्या एका भागात कोबाल्ट लावण्याचे काम सुरू आहे त्यामुळे त्या भागात वाहने येणे दाने बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे शेड आहे त्या ठिकाणी ठेकेदाराने सिमेंटच्या गोण्या व दुसऱ्या बाजूला नालीचे काम सुरू असल्याने काही मटेरियल सुद्धा पडलेले आहे पार्किंगच्या जागेत ठेकेदाराने बांधकाम साहित्य ठेवल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मध्ये कोडी निर्माण झाली. पार्किंग अभावी रस्ता रोखला गेल्याने १०० वाहनांवर कारवाई वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली
ठेकेदाराचे 'सिमेंट' अन् जनतेला 'पेमेंट'!
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरण सध्या जोरात सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने शिस्त धाब्यावर बसवत पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेतच सिमेंटच्या गोण्यांचा साठा केला आहे. एका बाजूला गोण्या आणि दुसऱ्या बाजूला नालीचे खोदकाम, अशा कात्रीत पार्किंग सापडले आहे. जागा नसल्याने नागरिकांनी आपली वाहने सर्कलच्या बाजूला आणि मिळेल त्या जागेत लावली. यामुळे कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच वाहनांची गर्दी झाली आणि रस्ता पूर्णपणे अडवला गेला.
जिल्हाधिकाऱ्यांना चालावे लागले पायी
रस्ता अडवला गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या ताफ्याला आत जाणे अशक्य झाले. अखेर 'साहेबांना' आपली गाडी सोडून कार्यालयापर्यंत पायी प्रवास करावा लागला. यावेळी काही नागरिकांनी "गाड्या इथेच लावणार" म्हणत हुज्जत घातली. हा सर्व प्रकार पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस अधीक्षकांना (SP) पाचारण केले.
वाहतूक पोलिसांची आक्रमक 'बॅटिंग'
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला सूचना देऊनही नागरिक आणि काही अधिकारी वाहन हटवण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत 'नो पार्किंग' आणि रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या तब्बल १०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
नागरिकांमधून आता एकच सवाल विचारला जात आहे
जर पार्किंगच्या जागेत ठेकेदाराने सिमेंट ठेवले नसते, तर ही वेळ आली असती का? प्रशासनाने रस्ता अडवणाऱ्या वाहनांवर कारवाई केली खरी, पण ज्या ठेकेदाराने पार्किंगची जागा अडवून हा सर्व गोंधळ निर्माण केला, त्याच्यावर प्रशासन काय कारवाई करणार? असा आक्रमक सवाल आता विचारला जात आहे.