Crime pudhari photo
जळगाव

Jalgaon chopda teacher job fraud | शिक्षक नोकरीचे आमिष दाखवून ३.८७ लाखांचा गंडा! चोपडा तालुक्यातील प्रकार

तिघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीसह तिच्या वडिलांची तब्बल ३ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा शहरातील गुरुकुल नगर (प्लॉट क्र. २४) येथील रहिवासी विद्या विश्वास बाविस्कर (वय ३२) यांनी याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २३ एप्रिल २०२२ ते १७ जून २०२४ या कालावधीत आरोपी गोपाल कृष्णाजी दाभाडे, प्रकाश गवा चव्हाण (दोघे रा. रामपुरा, चोपडा) आणि गोरख बुधा बोरसे (रा. पारगाव, ता. चोपडा) यांनी संगनमत करून हा बनाव रचला.

आरोपींनी विद्या बाविस्कर यांना मालापूर (ता. चोपडा) येथील कै. तुळशीराम कामाजी बाविस्कर उच्च प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवले. या कामासाठी आरोपींनी मालापूर येथील शाळेजवळ, चोपडा शहरातील महावीर नगर आणि नायरा पेट्रोल पंप परिसरात वेळोवेळी फिर्यादी विद्या व त्यांचे वडील विश्वास बाविस्कर यांच्याकडून रोख रक्कम उकळली. तब्बल ३ लाख ८७ हजार रुपये घेतल्यानंतरही नोकरी न लावता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने बाविस्कर यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांची कारवाई आणि तपास

या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.१५ वाजता गु.र.क्र. २२९/२०२६ नुसार भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तपासात 'ई-साक्ष' (e-Saksh) प्रणालीचाही वापर करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहित मोरे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT