जळगाव : महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना गुरुवारी (दि. ५) विधानसभेतील कामकाजा दरम्यान मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
विधानसभेतील कामकाज सुरू असताना त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. आमदार पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.