Jalgaon Chopda Road Tapi River Accident
जळगाव : जळगावहून चोपड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी काळरात्र ठरता ठरता राहिली. मध्यरात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास विदगाव येथील तापी नदीच्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र, या अपघातामुळे पुन्हा एकदा विदगाव पुलावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच ठिकाणी यापूर्वीही अपघात होऊन जीवितहानी झालेली असताना अद्याप संरक्षण भिंत किंवा मजबूत सुरक्षा कठडे उभारण्यात आले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील काही रहिवासी कारने जळगावहून घराकडे परतत होते. रात्री सुमारे ३ वाजता विदगाव पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट तापी नदीच्या पात्रात कोसळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
या अपघातात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, सकाळी सुमारे १० वाजता क्रेनच्या साहाय्याने नदीपात्रातून कार बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी जळगाव-चोपडा मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
विशेष म्हणजे, याच विदगाव येथील तापी नदीपात्रात काही महिन्यांपूर्वी असाच भीषण कार अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत एका महिलेसह एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पुलाजवळील धोकादायक वळणावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
वारंवार अपघात होऊनही संरक्षण भिंत, लोखंडी कठडे किंवा अन्य प्रभावी सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना वेळेत करण्यात आल्या असत्या तर अपघातांची तीव्रता कमी करता आली असती, अशी भावना वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. “प्रशासनाला आणखी किती अपघात आणि जीवितहानीची प्रतीक्षा आहे?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जळगाव-चोपडा मार्गावरील विदगाव पुलाजवळ तातडीने मजबूत संरक्षण भिंत, लोखंडी कठडे तसेच आवश्यक दिशादर्शक आणि प्रतिबंधक उपाययोजना उभाराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि नियमित प्रवाशांकडून होत आहे.