Rahuri Robbery Pudhari
जळगाव

Jalgaon robbery update | जळगाव जिल्ह्याला चोरट्यांचा विळखा; मुक्ताईनगर, पाचोरा अन् जळगावात लाखांचा डल्ला

घरफोडी आणि भरदिवसा लूट; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान, आरोपी अद्याप मोकाट

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून मुक्ताईनगर, पाचोरा आणि जळगाव शहर परिसरात चोरीच्या मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. मुक्ताईनगरमध्ये घराचे कुलूप तोडून, जळगावात चावीचा शिताफीने वापर करून, तर पाचोऱ्यात बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटनांमध्ये अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने 'खाकी'च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

१. मुक्ताईनगर: अंतुर्लीत घराचे कुलूप तोडून पोत लांबविली

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील बालकृष्ण नगरमध्ये राहणारे वसंता दामू बेलदार यांच्या घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. २७ मार्च रोजी रात्री ७ ते १० वाजेच्या सुमारास बेलदार कुटुंबीय घराबाहेर असताना चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकुमार मनिंदर सिंग चव्हाण तपास करीत असून आरोपी अद्याप फरार आहे.

२. जळगाव शहर: 'शकुंतला हाईट्स'मध्ये चावीचा वापर करून घरफोडी

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील 'शकुंतला हाईट्स'मध्ये राहणाऱ्या तृषा चंद्रकांत संन्यासी यांच्या घरात चोरीची धक्कादायक घटना घडली. घराच्या दरवाज्याजवळच ठेवलेल्या चावीचा वापर करून चोरट्याने अत्यंत शिताफीने कुलूप उघडले आणि घरात प्रवेश केला. कपाटातील १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

३. पाचोरा: बसमधील गर्दीचा फायदा घेत भाजीपाला विक्रेत्याला लुटले

पाचोरा बस स्थानकावर चढताना बोदवड येथील भाजीपाला विक्रेता शेख महमूद शेख मेहबूब आणि त्यांची मुलगी शरीराबी यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. पाचोरा-जामनेर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने मुलीच्या पर्समधून ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत (९ ग्रॅम), २० हजार रुपयांच्या सोन्याच्या बाह्या (४० ग्रॅम) आणि ७ हजार रुपयांची रोकड, असा एकूण मोठा ऐवज लंपास केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख या चोरीचा तपास करत असून आरोपी अद्याप अटकेत नाही.

खाकीची पकड सैल?

जिल्ह्यात एकामागून एक चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरफोडी असो वा गर्दीतील चोरी, चोरटे पोलिसांना उघड आव्हान देत आहेत. चोऱ्यांचे सत्र थांबवून आरोपींच्या मुसक्या कधी आवळल्या जातात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT