जळगाव : नरेंद्र पाटील
बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून चोपडा ते रावेर वनक्षेत्रात एकूण 39 मचाणांची उभारणी करण्यात आली आहे.
प्रत्येक मचानावर ३ ते ४ व्यक्ती बसू शकतील असे मचाण उभारण्यात आले आहे. यामध्ये चोपडा – ३, वैजापूर – ७, अडावद – ५, देवझिरी – ५, यावल पूर्व – ६, यावल पश्चिम – ५ आणि रावेर – ८ अशाप्रकारे मचाणांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष निरीक्षण व ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे होणाऱ्या या गणनेत निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना बिबटे, अस्वल, सांबर, तडस, चितळ, नीलगाय, मोर यांसारख्या वन्यजीवांचे शांत तर काही थरारक क्षणांचे रात्रीच्या वेळी निरीक्षण करता येणार आहे.
कार्यक्रमासाठी सहभाग शुल्क प्रति व्यक्ती ५०० रुपसे असून त्यात भोजन व सुविधा समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच नोंदणीसाठी QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि मचाण उभारणी करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नियोजन वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक शेख, सहाय्यक वनसंरक्षक हाडपे आणि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. संपूर्ण वनविभाग ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रमाच्या यशासाठी झटतो आहे.