जळगाव : पारोळा शहरातील कजगाव रोडवरील गजू पाटील यांच्या ढेपच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवरून अज्ञात चोरट्याने साडेपाच लाख रुपये असलेली पिशवी लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.३) दुपारी घडली. भररस्त्यात आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या धाडसी चोरीमुळे पारोळा शहरात व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
शिव कॉलनी (उंदीरखेडा रोड) येथील रहिवासी आणि दूध व्यावसायिक रामचंद्र भटू हटकर (वय ५४) हे मंगळवारी (दि. ३) आपल्या कामासाठी बाहेर आले होते. दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एम.एच.१९ डी.एन ०८०१) कजगाव रोडवरील गजू पाटील यांच्या ढेपच्या दुकानासमोर उभी केली होती. या गाडीच्या उजव्या बाजूच्या हँडलला 'वैभव कृषी केंद्र' नावाच्या कापडी पिशवीत ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड ठेवलेली होती.
नजर चुकवली अन् पिशवी गायब
हटकर हे काही कामात व्यस्त असताना, अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून हँडलला टांगलेली पैशांची पिशवी शिताफीने चोरून नेली. काही वेळाने हटकर यांना पिशवी जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांचे पाय जमिनीला टेकले नाहीत. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र चोरटा तोपर्यंत पसार झाला होता.
९०० नोटा ५०० च्या, १००० नोटा १०० च्या
चोरून नेलेल्या पिशवीत मोठ्या प्रमाणात रोकड होती. यामध्ये ५०० रुपये दराच्या एकूण ९०० नोटा (४ लाख ५० हजार) आणि १०० रुपये दराच्या १००० नोटा (१ लाख) असा एकूण ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल होता. दिवसाढवळ्या एवढी मोठी रक्कम चोरीला गेल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलीस तपासाचे आव्हान
या प्रकरणी रामचंद्र हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, तपासी अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चोरटा अज्ञात असून त्याला पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
जळगाव : भुसावळ शहरातील एका २७ वर्षीय तरुणीची १० लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केली आणि लग्नासाठी दबाव टाकून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एका तरुणाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात २७ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित अरोपी सिद्धांक मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याने सन २०२० मध्ये या तरूणीची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने पिडीत तरूणीची ओळखीचा फायदा घेऊन तिला शेअर मार्केटमध्ये फायदा करून देण्याचे आमिष दाखवले. त्याने तिच्या डी-मॅट अकाउंटची माहिती घेऊन आणि क्रेडिट कार्ड वापरून सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर, त्याने लग्नासाठी दबाव टाकून तिचा मुंबई ते मंगलोरपर्यंत पाठलाग केला. फिर्यादीच्या घरात घुसून तिला चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला आणि तिचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणीने तक्रार दिली त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ अधिक तपास करत आहेत