जळगाव : शासनाच्या 'वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजने' अंतर्गत प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उमेश शामकांत सपकाळे (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, गुरुवारी (३० जुलै) पंचायत समिती कार्यालयाच्या गॅलरीत ६०० रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय तक्रारदार हे व्यावसायिक वादक कलाकार आहेत. शासनाच्या 'वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजने'चा लाभ मिळावा यासाठी त्यांनी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी बोदवड पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आली होती.
दरम्यान, अर्जाच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी तक्रारदार कार्यालयात गेले असता, कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे याने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठवण्याच्या मोबदल्यात ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत याबाबत ३० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पडताळणीदरम्यान आरोपीने तडजोडीअंती ६०० रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार बोदवड पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागाबाहेरील गॅलरीत तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उमेश सपकाळे याला पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तसेच अंमलदार बाळू मराठे, राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.