जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेच्या उमेदवाराचे दोन अर्ज वैध राहिल्याने बोदवड नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिंदे सेनेची सत्ता निश्चित झाली आहे.
भाजपाकडून या निवडणुकीत कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी भाजपाचे उमेदवार विजय बडगुजर यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चार वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले शिंदे सेनेचे आनंदा पाटील यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने उर्वरित नऊ महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मंगळवार (दि.16) रोजी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेतर्फे मीना दिनेश माळी यांनी दोन अर्ज दाखल केले. प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे निकाल औपचारिक ठरणार आहे.
बिनविरोध तरीही अधिकृत घोषणेची सर्वांना प्रतीक्षा
या निवडणुकीचा अधिकृत निकाल २२ तारखेला जाहीर होणार असला, तरी बिनविरोध स्थितीमुळे बोदवड नगरपंचायतीवर शिंदे सेनेचाच नगराध्यक्ष विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या केवळ अधिकृत घोषणेची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.
दरम्यान, याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, माजी नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली. आगामी काळात नवनिर्वाचित नगराध्यक्ष मीना दिनेश माळी देखील प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपाच्या नगरसेवकांचा पाठिंबा शिंदे सेनेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.