जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार व अजित पवार गटामध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षाला नवे वळण आले आहे. माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील यांनी शरद पवार गटाला रामराम करत येत्या 3 मे रोजी मुंबईत अजित पवार गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि एक माजी आमदार देखील अजित पवार गटात जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
सतीश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गेल्या 35 वर्षांपासून कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्या न्यायासाठी मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोणतीही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक नसली, तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना बळ मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”
या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठे परिवर्तन घडणार असून, अजित पवार गटाला जळगाव शहर, एरंडोल व अंमळनेर या भागांमध्ये भक्कम ताकद मिळणार आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.