Bhusawal Railway | भुसावळ रेल्वे स्थानकावर 'अवैध वेंडिंग'विरुद्ध धडक मोहीम; ९ विक्रेत्यांना २०,५०० रुपयांचा दंड! 
जळगाव

Bhusawal Railway | भुसावळ रेल्वे स्थानकावर 'अवैध वेंडिंग'विरुद्ध धडक मोहीम; ९ विक्रेत्यांना २०,५०० रुपयांचा दंड!

सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याने पकडली चोरी; वाणिज्य विभाग आणि आरपीएफची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आणि रेल्वे नियमांची पायमल्ली करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. २४ सप्टेंबर रोजी वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाने राबविलेल्या संयुक्त तपासणी मोहिमेत ९ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत एकूण २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ स्थानकावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वेंडिंग सुरू असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सहायक वाणिज्य व्यवस्थापक (टीसी) पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली वाणिज्य आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने स्थानकावर अचानक छापा टाकला. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांची ओळख पटवण्यात आली.

अधिकृत विक्रेत्यांची मनमानी

४ अधिकृत कार्डधारक विक्रेते निर्धारित नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे ट्रॉलीद्वारे विक्री करताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अन्वये कारवाई करून ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अनधिकृत फेरीवाले गजाआड

स्थानकावर बेकायदेशीरपणे शिरकाव करून खाद्यपदार्थ विकणाऱ्या ५ अनधिकृत विक्रेत्यांवर कलम १४४ व १४७ अंतर्गत कारवाई करत १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि स्थानकावरील शिस्त राखण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा कारवायांवर करडी नजर ठेवली जात असल्याचे भुसावळ विभागाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनीही केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी कराव्यात आणि गैरप्रकार आढळल्यास त्वरित रेल्वेच्या तक्रार निवारण प्रणालीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT