Bhusawal railway  
जळगाव

Bhusawal railway scrap sale|भुसावळ रेल्वे विभागाची भंगार विक्रीतून विक्रमी 'कमाई'; ५० कोटी रु.चा टप्पा अवघ्या काही महिन्यांत पार!

आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ५७.४० कोटींचा गल्ला; सप्टेंबर महिन्यातच तब्बल १६.९१ कोटींची विक्री

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पर्यावरण संवर्धन आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भंगार (स्क्रॅप) विक्रीत नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये अवघ्या काही महिन्यांत विभागाने तब्बल ५७.४० कोटी रुपयांची भंगार विक्री नोंदवली आहे. विशेष म्हणजे, ५० कोटी रुपयांचा टप्पा आतापर्यंतच्या सर्वांत कमी कालावधीत गाठण्याचा बहुमान भुसावळ विभागाने मिळवला आहे.

मध्य रेल्वेच्या ‘मिशन-झिरो स्क्रॅप स्टेटस’ या संकल्पनेला भुसावळ विभागाने प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. केवळ सप्टेंबर २०२६ या एकाच महिन्यात विभागाने तब्बल १६.९१ कोटी रुपयांचे भंगार विकून रेल्वेच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा केला. रेल्वे परिसरात विनावापर पडून असलेले जुने साहित्य, रूळ आणि इतर निष्प्रयोज्य साहित्याची अत्यंत नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्यात आल्याने ही विक्रमी कमाई शक्य झाली आहे.

समन्वय आणि प्रभावी व्यवस्थापनाचे फळ

प्रभावी भंगार व्यवस्थापन, अधिकाऱ्यांची नियमित देखरेख आणि विविध विभागांमधील अचूक ताळमेळ यामुळे भुसावळ विभागाने हा टप्पा विक्रमी वेळेत पार केला आहे. मंडल रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्टोअर्स विभागासह इतर संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांमुळे हा विक्रम साकार झाला.

निष्प्रयोज्य साहित्याची वेळेत विल्हेवाट लावल्याने रेल्वे परिसर स्वच्छ होण्यासोबतच आर्थिक शिस्त आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत झाली आहे. भंगार विक्रीच्या बाबतीत भुसावळ विभाग मध्य रेल्वेत सातत्याने नवे मानदंड प्रस्थापित करत असल्याचे या कामगिरीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT