Railway news Pudhari
जळगाव

Bhusawal Railway news | भुसावळ रेल्वेचा देशपातळीवर 'डंका'; वक्तशीरपणात भारतीय रेल्वेत 'नंबर १'

६९ विभागांना धोबीपछाड देत मारली बाजी; १०० टक्के वेळपालनाचा ऐतिहासिक विक्रम, 'झिरो टॉलरन्स' धोरण फळाला

पुढारी वृत्तसेवा

​​जळगाव : मध्य रेल्वेचा कणा समजल्या जाणाऱ्या भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा 'सुसाट' ठसा उमटवला आहे. १३ मार्च २०२६ रोजी भारतीय रेल्वेच्या एकूण ६९ विभागांमध्ये गाडी वक्तशीरपणाच्या (Punctuality) बाबतीत भुसावळ विभागाने प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, या दिवशी धावलेल्या सर्व १७३ गाड्या १०० टक्के वेळेवर धावल्या असून, हा रेल्वेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे.

​दिग्गज विभागांना टाकले मागे

भुसावळ विभागाने नोंदवलेला हा विक्रम केवळ कागदोपत्री नसून तो आकडेवारीनेही सिद्ध झाला आहे. या विभागाने दुसऱ्या क्रमांकावरील जोधपूर विभागाच्या तुलनेत दुप्पट यश मिळवले आहे. हुबळी, राजकोट आणि भावनगर या तिन्ही विभागांच्या एकत्रित गाड्यांच्या संख्येपेक्षाही (१५४ गाड्या) जास्त गाड्या भुसावळने एकट्याने (१७३ गाड्या) वेळेवर चालवून दाखवल्या आहेत. भारतीय रेल्वेमध्ये सर्वाधिक मेल/एक्सप्रेस गाड्या चालविणाऱ्या पहिल्या ११ विभागांमध्ये आता भुसावळचे नाव सन्मानाने घेतले जात आहे.

​ऐतिहासिक १०० टक्के वेळपालनाचा टप्पा

भुसावळ विभागाच्या इतिहासात विभागीय स्तरावर १०० टक्के वक्तशीरपणाचा हा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी ९८.३२ टक्के वेळपालनाचा विक्रम नोंदवण्यात आला होता, जो अवघ्या दोन दिवसांतच मोडीत निघाला आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत ३, ५, ११ आणि १३ मार्च अशा चार दिवसांत विभागाने १०० टक्के वक्तशीरपणाची नोंद केली आहे. यामुळे मध्य रेल्वेला झोनल स्तरावर देशात ५ व्या क्रमांकावर पोहोचवण्यात मोलाची मदत झाली आहे.

​'झिरो टॉलरन्स' आणि कर्मचाऱ्यांची सज्जता

दररोज सरासरी १७० पेक्षा अधिक मेल/एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक सांभाळणे हे नियंत्रण कक्षासाठी (Control Room) मोठे आव्हान असते. मात्र, ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी 'मानसिक सज्जता' आणि 'शून्य सहनशीलता धोरण' (Zero Tolerance Policy) अवलंबल्यामुळे हे यश साध्य झाले आहे. गाड्यांच्या संचलनावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवलेले बारीक लक्ष आणि कार्यक्षम व्यवस्थापन यामुळेच प्रवाशांना 'वेळेवर' सेवा देणे शक्य झाले आहे.

​प्रवाशांचा प्रवास सुखाचा

मध्य रेल्वे सध्या ९२ टक्के एकूण वेळपालनावर काम करत असली, तरी भुसावळ विभागाने १०० टक्के निकाल देऊन रेल्वेची विश्वासार्हता वाढवली आहे. प्रवाशांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने या यशानंतर व्यक्त केला आहे. या 'सुपरफास्ट' कामगिरीमुळे भुसावळ विभागाचे रेल्वे वर्तुळात कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT