जळगाव

Bhusawal Nagar Parishad: अडीच तासांत 300 विषयांचा धडाका; सत्ताधाऱ्यांची 'बॅटिंग’, एलईडीचा 3 कोटींचा 'मलिदा' नाकारला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि नाशिक विभागीय क्षेत्रात 'अ' दर्जाचा मान मिरवणाऱ्या 150 वर्षांपेक्षा अधिक जुन्या भुसावळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी पार पडली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही सभा दुपारी 1:30 वाजता, म्हणजे अवघ्या अडीच तासांत आटपली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक सभेला उपस्थित नव्हता. विरोधकांच्या अनुपस्थितीचा पूर्ण फायदा उठवत सत्ताधाऱ्यांनी 301 विषयांपैकी तब्बल 300 विषय एकमताने मंजूर केले, तर पालिकेची आर्थिक कोंडी करणाऱ्या एका वादग्रस्त विषयाला थेट केराची टोपली दाखवली.

लोकनियुक्त नगराध्यक्ष अपात्र ठरल्यामुळे गुरुवारची सभा प्रभारी नगराध्यक्षा शैलेजा पुरुषोत्तम नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटनेते युवराज लोणारी, प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे आणि भाजप-शिंदे सेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

3 कोटींची उधळपट्टी कशासाठी? 'तो' विषय नामंजूर!

या सभेतील सर्वात मोठा दणका विषय क्रमांक 37 ला बसला. शहरातील एलईडी व पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि नवीन एलईडी पुरवठ्यासाठी 'मेसर्स व्हील सी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड' यांच्या जॉइंट व्हेंचरला कंत्राट देण्याचा प्रस्ताव होता.

प्रति लाईट तब्बल 119 रुपये देखभाल दुरुस्ती, म्हणजेच वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये या कंपनीला मोजावे लागणार होते.

सत्ताधारी पक्षाचे गिरीश महाजन आणि इतर नगरसेवकांनी याला तीव्र विरोध केला. भुसावळ पालिकेची सद्यस्थिती पाहता एवढा अवाढव्य खर्च करणे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे, अशी आक्रमक भूमिका घेत सर्व नगरसेवकांनी हा एकच विषय नामंजूर केला.

पाणीसंकटावरुन नगरसेवक आक्रमक

तापी नदी आणि शेळगाव बॅरेजमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही भुसावळकरांना तब्बल 10 ते 15 दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला."शासन आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच 'अमृत 1' आणि 'अमृत 2' च्या कामांना विलंब झाला आहे. प्रशासनाने तात्काळ कामाला लागून पुढच्या उन्हाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण करावीत, जेणेकरून नागरिकांना किमान 4 दिवसांआड तरी पाणी मिळेल," असा थेट इशारा नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दिला.

महिलांची हेळसांड, भटक्या कुत्र्यांचा थरार आणि इतर महत्त्वाचे निर्णय:

शहरातील व्यापारी संकुलांमध्ये शौचालयांची अत्यंत वाईट अवस्था असून महिलांसाठी स्वतंत्र सोय नसल्यामुळे होणाऱ्या हेळसांडकडे नगरसेवक बबलू बऱ्हाटे यांनी लक्ष वेधले.

बाजारपेठेत असुविधा: शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे नसल्याचा मुद्दा महिला नगरसेविकांनी लावून धरला. यावर तात्काळ व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले.

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट: शहरात श्वानदंशमुळे एका नागरिकाला जीव गमवावा लागल्याचा मुद्दा गाजला. यावर, "राज्यातील मान्यताप्राप्त संस्थांकडे मनुष्यबळ नसल्याने अडचणी येत आहेत," असा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी केला. तसेच उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले.

महाजेनकोसोबत महत्त्वाचा करार: भुयारी गटारी व २७ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी पाण्याच्या पुनर्वापराबाबत महाजेनकोसोबत 30 वर्षांचा करार मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, नगरपालिकेचा जो 15% हिस्सा भरायचा आहे, तो देखील महाजेनकोच भरणार आहे.

रस्ते आणि सुशोभीकरण: जामनेर रोड ते सातारा ब्रिज व जळगाव रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला मंजुरी देण्यात आली, तसेच जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिराजवळील डिव्हायडरच्या सुशोभीकरणाचा ठरावही मंजूर झाला.

नमो उद्यान आणि सिग्नल यंत्रणा: नमो उद्यानासाठी जागा निश्चितीला मंजुरी देण्यात आली असून, शासनाचा 1 कोटीचा पडून असलेला निधी आता वापरला जाईल. यासोबतच, भंगारात गेलेली शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विरोधी पक्षाने पाठ फिरवल्यामुळे भुसावळ पालिकेचा कारभार सध्या पूर्णपणे 'एकचालू अनुवादा'सारखा सुरू असून, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी प्रशासन किती वेगाने करते, याकडे आता भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT