murder case Pudhari
जळगाव

Jalgaon Murder | भुसावळात गुन्हेगारांचा हैदोस; सिमेंटच्या कुंडीने ठेचून तरुणाची हत्या, शहरात खळबळ

नेब कॉलनी परिसरात किरकोळ वादाचा थरार; ४२ वर्षीय तरुणाचा जागीच अंत, शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रेल्वे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून एका ४२ वर्षीय तरुणाचा सिमेंटची कुंडी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अनिल ऊर्फ पिंटू आत्माराम सावकारे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मध्यरात्री १ वाजता रक्ताचा सडा...

मिळालेल्या माहितीनुसार, ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास आनंद नगरला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले आणि समोरच्या व्यक्तीने रागाच्या भरात अनिल सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची जड कुंडी घातली. या भीषण हल्ल्यात सावकारे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

पोलीस फौजफाटा घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाली. डीवायएसपी केदार बारबोले बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पिंटू सावकारे यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात गर्दी केली होती. ऐन मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे भुसावळ मधील गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT