जळगाव : आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची बाजी जिंकून देण्यासाठी मुख्यमंत्री सोमवार (दि.24) रोजी भुसावळच्या सभेत सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते. पण आजही मूलभूत सुविधा अडचणीत असताना नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
विकासाचे दावे आणि भुसावळची सद्यस्थिती
विधानसभा काळातील चौफेर विकासाच्या घोषणा अजूनही कागदावरच आहेत. रस्त्यांव्यतिरिक्त मोठे प्रकल्प पुढे सरकले नाहीत. काही भागात रस्त्यांची अवस्था बदललेली नाही.
तापी नदीजवळ असूनही नागरिकांना बारा दिवसांनी एकदा पाणी मिळते. पाण्याचे नियोजन ढिसाळ असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मुख्यमंत्री दिलेल्या आश्वासनांनंतरही परिस्थिती तशीच का राहिली, याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
रोजगार आणि व्यापारी संकुलांचा गोंधळ कायम
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प आलेला नाही. शहरातील व्यापारी संकुलांचे कामही कागदावरच असून काही प्रकल्पांना सुरुवातीची तारीखही मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर आमदार सावकारे यांच्या पत्नीची उमेदवारी चर्चेत आली आहे. त्यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रचार करणार हे भुसावळच्या राजकारणातील महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.
‘मुख्यमंत्र्यांशिवाय विजय कठीण?’
राजकीय विश्लेषकांच्या मते, नगराध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरणे या दोन गोष्टी स्पष्ट करते
सत्ताधारी पक्षाला स्थानिक पातळीवर पूर्ण खात्री नाही.
मुख्यमंत्र्यांचा प्रभाव नसता तर विजय अवघड ठरू शकतो, हे पक्षाने मान्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा भुसावळचे राजकारण पुन्हा तापणार आहे. अडकलेले विकासाचे प्रयत्न या वेळेस गती घेणार की, पुन्हा आश्वासनांचाच पाऊस पडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.