Bhusawal Crime | भुसावळ मालधक्यावर बंद खोलीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह; 'हद्द कोणाची?' यावरून पोलिसांचा वाद! 
जळगाव

Bhusawal Crime | भुसावळ मालधक्यावर बंद खोलीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह; 'हद्द कोणाची?' यावरून पोलिसांचा वाद!

धड खाली, शिर वर; रेल्वे गोडाऊनमधील भयावह प्रकाराने भुसावळ मध्ये खळबळ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: पूर्वी नेहमी गजबजलेल्या रेल्वेच्या जुन्या भुसावळ मधील मालधक्क्यातील एका बंद खोलीत अज्ञात इसमाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात तीव्र खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाचे शिर लटकलेल्या अवस्थेत होते, तर कुजलेले धड खाली जमिनीवर पडले होते. अंदाजे महिनाभरापूर्वी ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू करण्याऐवजी "हद्द कोणाची?" यावर रेल्वे आणि राज्य पोलिसांमध्ये बराचवेळ चर्चा सुरू होती.

चेहरा अन् शरीर पूर्णपणे कुजले; हत्येचा संशय

भुसावळ रेल्वेच्या जुन्या गुड्स यार्डमधील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी आत डोकावून पाहिले असता हा भयावह प्रकार समोर आला. मृतदेहाच्या अंगावर काही कपडे शिल्लक आहेत, मात्र चेहरा आणि शरीर पूर्णपणे सडल्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:

सुरक्षा रक्षक असताना अज्ञात व्यक्ती बंद गोडाऊनमध्ये पोहोचली कशी?

त्या खोलीची चावी कोणी घेतली होती की कुलूप तोडून प्रवेश केला गेला?

ही आत्महत्या आहे की पुरावा नष्ट करण्यासाठी झालेला घातपात?

तपास सोडून हद्दीचा वाद!

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF), रेल्वे पोलीस (GRP) आणि महाराष्ट्र राज्य पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. परंतु, गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवण्याऐवजी "हा भाग आमच्या हद्दीत येत नाही" असा कांगावा करत अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत राहिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा दळत घटनास्थळावर केवळ 'हद्दीची चर्चा' सुरू होती.

एकीकडे महिनाभरापासून बंद खोलीत मृतदेह सडत राहतो अन् दुसरीकडे खाकी वर्दी हद्दीच्या वादात अडकते, यावरून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी अधिकारी हद्दीचा वाद मिटवून या रहस्यमय मृत्यूचा उलगडा करणार का, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT