भुसावळ रेल्वे स्थानकावर 'ऑपरेशन नार्कोस' अंतर्गत कारवाई; उधना अमृत भारत एक्सप्रेसमधून ४ लाखांचा गांजा जप्त! 
जळगाव

Bhusaval Crime | भुसावळ रेल्वे स्थानकावर 'ऑपरेशन नार्कोस' अंतर्गत कारवाई; उधना अमृत भारत एक्सप्रेसमधून ४ लाखांचा गांजा जप्त!

ओडिशातून चालला होता गांजाचा तस्करीचा खेळ; आरपीएफ अन् 'वीरू' श्वानाच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. उधना अमृत भारत एक्सप्रेसमधून सुमारे ३ लाख ९८ हजार ९०० रुपये किमतीचा ७.९७८ किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला असून, उडीसातील एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३0जुलै ट्रेन क्रमांक १९०२२ अप (उधना अमृत भारत एक्सप्रेस) मधील जनरल डब्यात (जी एस कोच क्र. WR 260321) सीआयबी (CIB) भुसावळचे उपनिरीक्षक सुनील कोळी हे गस्तीवर होते. दरम्यान, एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. आरोपी बाबू विजय गौडा (वय २३, रा. धमनखोला डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा) याने ट्रेनच्या बाथरूममध्ये अमली पदार्थ लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तत्काळ संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले आणि भुसावळ स्थानकावर गाडी पोहोचताच (सकाळी ४:०५ वाजता, प्लॅटफॉर्म क्र. ४) एएसआय ओ. पी. मीना व त्यांच्या पथकाने आरोपीला ट्रेनमधून खाली उतरवून सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवले.

'वीरू' श्वानाने शोधला अमली साठा!

घटनेची माहिती मिळताच भुसावळ स्टेशनचे आरपीएफ निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. नियंत्रण कक्षाच्या मदतीने डॉग स्क्वॉडच्या 'वीरू' या ऑन-ड्यूटी श्वानाला पाचारण करण्यात आले. वीरूने संशयित बॅगेचा सुगावा घेत त्यात अमली पदार्थ असल्याची खात्रीशीर पुष्टी केली.

यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि राजपत्रित अधिकारी अभय कुमार शर्मा (ACM गुड्स, भुसावळ) यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पंचांसमक्ष जप्तीचा पंचनामा करण्यात आला.

जप्त माल: ४ गांजाचे बंडल (सॅक बॅगमध्ये)

एकूण वजन: ७.९७८ किलोग्राम

अनुमानित किंमत: ₹ ३,९८,९००/-

जीआरपीकडे (GRP) आरोपी सुपूर्द

आरपीएफने जप्त केलेला गांजा व आरोपी बाबू विजय गौडा याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस ठाणे (GRP भुसावळ) यांच्या स्वाधीन केले आहे. आरपीएफच्या या धडक कारवाईमुळे रेल्वेतून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT