जळगाव : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. शिवतीर्थ येथून निघालेला हा मोर्चा एसटी स्टँड मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले. “सेवालाल महाराज की जय” घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक यांचे छायाचित्र असलेले बॅनर, झेंडे आणि फलक समाजाच्या एकजुटीचे दर्शन यावेळी घडवत होते.
मंगळवार (दि.7) रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिवतीर्थ येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यावर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत देवडी बंजारा समाजातील विविध नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “हैदराबाद गॅजेट आल्यानंतर समाजात जागर निर्माण झाला आहे, असे मत काही नेत्यांनी व्यक्त केले. त्यांनी शासनाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी केली मोर्चाप्रसंगी केली आहे.
पारंपरिक वेशभूषेत काढला मोर्चा
मोर्चामध्ये तरुणांनी ‘बंजारा गोरा कमांडो’ या नावाने स्वयंसेवकांची फळी तयार केली होती. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक तरुणांनी ढोल-डफच्या तालावर नृत्य करत मोर्चात रंग भरला. काहीजण सोशल मीडियासाठी व्हिडिओ आणि रील्स तयार करताना दिसले.
सांस्कृतिक एकतेचा संदेश
या मोर्चात पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचेही दर्शन घडले. सहभागी युवकांनी आपल्या समाजाचे ओळख पट्टे व टोपी परिधान करून सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोर्चेकऱ्यांनी दोन्ही बाजूचे रस्ते व्यापल्याने वाहतूक मार्गात बदल करावा लागला, यावरून उपस्थितीची प्रचंड प्रमाणात नोंद यावेळी दिसूनी आली. या मोर्चातून बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला नवी गती मिळाली असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.