Bacchu Kadu : दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट 
जळगाव

Bacchu Kadu : दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट, ‘आप्पांना’ लाल दिवा मिळायलाच हवा; बच्चू कडूंचा पाचोऱ्यात गौप्यस्फोट!

कापसाच्या भावात केंद्राने ३ हजारांचा घात केला, भाव देता येत नसेल तर शेती रोहयोत आणा; 'शिवसंवाद' यात्रेत कडूंचे थेट संकेत

पुढारी वृत्तसेवा

​जळगांव : "येणाऱ्या निवडणुका या शिवसेनेच्याच असतील आणि राज्यात पूर्ण ताकदीने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्राचे संपूर्ण चित्र बदललेले दिसेल. आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तीन टर्म एवढ्या प्रचंड ताकदीने निवडून येत आहेत, मग मंत्रिमंडळात खांदेपालट का होऊ नये? आप्पांना मंत्रिपद मिळाले पाहिजे, ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भावना अजिबात गैर नाही. माझ्या शब्दावर मंत्रिपद मिळत असेल, तर मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे जाईन. दिवाळीनंतर हे चित्र बदलेल, असे मुख्यमंत्र्यांनीही म्हटल्याचे समजते," असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा शिवसेना नेते बच्चू कडू यांनी पाचोरा येथील ‘शिवसंवाद’ दरम्यान केला.

​कापसाला केंद्राने ३ हजारांनी तोट्यात ढकलले; शेती 'एमआरजीएस'मध्ये आणा!

कापसाच्या हमीभावावरून केंद्र सरकारवर तोफ डागताना कडू म्हणाले, "भावामध्ये प्रचंड तफावत आहे. राज्य सरकारने १५ टक्के नफा धरून प्रति क्विंटल ११ हजार रुपयांची रीतसर शिफारस केंद्राकडे केली होती. मात्र, केंद्राने केवळ ८ हजार रुपयांचा भाव दिला. थेट ३ हजार रुपयांचा फरक पडल्याने १५ टक्के नफा तर सोडाच, शेतकरी थेट मायनसमध्ये गेला आहे. जर सरकारला पिकांना योग्य भाव देता येत नसेल, तर पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च 'एमआरजीएस' (रोहयो) अंतर्गत कव्हर करावा, अशी शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे."

​आंदोलन फडणवीसांविरोधात नाही, शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी!

आंदोलनाच्या इशाऱ्यावर भूमिका स्पष्ट करताना बच्चू कडू यांनी विरोधकांना फटकारले. "आंदोलन हे केवळ सरकारच्या विरोधात किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध करण्यासाठी नसते, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. शेतकऱ्यांचे संघटन मजबूत करणे हाही आंदोलनाचा मोठा भाग असतो. आम्ही सत्तेच्या विरोधात नव्हे, तर संकटात सापडलेल्या बळीराजाच्या हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहोत."

​वार्षिक २५ हजार कोटी द्या; महाराष्ट्र कायमचा कर्जमुक्त करा!

शेतकरी कर्जमुक्तीवर ठोस तोडगा मांडताना ते म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर सुमारे ७५ हजार कोटींचे पीककर्ज आहे. सरकारने दरवर्षी अर्थसंकल्पातून (बजेट) २५-२५ हजार कोटी रुपये वेगळे काढले, तर अवघ्या तीन वर्षांत राज्यातील तमाम शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त होऊ शकतात. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणे तातडीचे आहे."

​संजय राऊत 'आमच्याच मतांवर खासदार झाले!'

संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर सडकून टीका करताना कडू म्हणाले, "संजय राऊत यांची ती रोजची ठरलेली ‘आकाशवाणी’ आहे. रोज त्यांना टीव्हीवर दाखवायला मीडियाचे त्यांच्यावर नेमके काय प्रेम आहे, तेच समजत नाही. ते काही राज्याचे वा देशाचे मुख्यमंत्री नाहीत. उलट त्यांची खासदारकीसुद्धा आमच्याच मतांवर निवडून आलेली आहे; मी स्वतः शिवसेनेचा नसतानाही त्यांना मतदान केले होते, हे त्यांनी विसरू नये."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT