Raver Assembly Election
File Photo
जळगाव

Assembly Election | अपक्षाला पक्षाच्या तिकिटावर विजय मिळेल का?

मुक्ताईनगर विधानसभेत कोण मारणार बाजी?

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र खडसे परिवाराचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जायचे. मात्र 2019 मध्ये अपक्ष उमेदवाराने या ठिकाणी येऊन खडसे परिवाराला पराभवाची धूळ चारत बालेकिल्लात विजय मिळवला होता. तोच अपक्ष उमेदवार आता पक्षाच्या तिकिटावर लढत असल्याने व ज्यांनी त्याला सहकार्य केलं त्याच पक्षाने त्यांच्यासमोर उमेदवार उभा केला असल्याने अपक्ष उमेदवार पक्षाच्या तिकिटावर विजयी होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष मध्ये असताना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन यांनी त्यांना छुपी मदत केली होती. यावेळेस छुपी जादू कोण करणार व चंद्रकांत पाटलांना विजयापर्यंत नेणार असा प्रश्न उभा राहत आहे.

2014 मध्ये एकनाथराव खडसे यांनी चंद्रकांत पाटलांचा 9708 मतांनी पराभव केला होता.

2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत भाजपाच्या रोहिणी खडसे यांचा 1957 मतांनी पराभव केला होता.

जळगाव जिल्हा म्हटलं की खडसे हे एक नाव समोर येते खडसे यांच्या मतदारसंघावर अपक्ष उमेदवाराने आपला झेंडा रोवलेला आहे. यापूर्वी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र काँग्रेस , काँग्रेस आय, काँग्रेस एस यांच्या वर्चस्व नंतर भाजपचे वर्चस्व होते. या मतदारसंघावर 1962 ते 85 काँग्रेस , काँग्रेस आय, काँग्रेस एस या पक्षाचे वर्चस्व मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रावर राहिलेले आहे,. त्यानंतर 1990 मध्ये भाजपाचे उमेदवार एकनाथराव खडसे यांनी 2014 पर्यंत या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवलेले होते. मात्र खडसेंना 2019 मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या मुलीला मुक्ताईनगर मधून भाजपचे तिकीटावर उमेदवारी देण्यात आले मात्र त्यावेळेस 1957 मतांनी अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला विजय साजरा केला होता. हा विजयामध्ये भाजपाची छुपी साथ राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ काँग्रेस पक्षाचा हात अशा अनेकांनी आपले बळ त्या अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना दिलेले होते. त्यामुळे अल्पशा मताने का होईना अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. यावेळेस अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश घेतल्यामुळे चंद्रकांत पाटील हे शिंदे सेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर मुक्ताईनगर मध्ये रिंगणात उतरले आहे.

यावेळेस परिस्थिती अचानक बदललेली आहे गेल्या वेळेस भाजपाचे तिकीट असलेल्या रोहिणी खडसे यांनी पक्ष बदलून हातावर घड्याळ बांधल्यामुळे ज्या घड्याळाची साथ अपक्ष उमेदवार व विद्यमान शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती आता त्यांना मिळणार का? त्यांना छुपी साथ मिळणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. भाजप पाहिजे तसेच सहकार्य करणार आहे का! युती जरी असली तरी हाही मुद्दा महत्वाचा ठरेल. एकनाथराव खडसे व चंद्रकांत पाटील यांच्यातील वैर मतदार संघातील नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व त्या प्रमाणात खडसेंचे समर्थक असलेले लोक चंद्रकांत पाटलांना सहकार्य करतील का जे अपक्ष उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपा राष्ट्रवादीने छुपी सहकार्य केले होते ते त्यांना खुलेआम आता युतीचा उमेदवार म्हणून सहकार्य करतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे गेल्या वेळेस अल्पशा मतांनी विजयी झालेले चंद्रकांत पाटील यावेळेस आपली विजयाची घोडदैड कायम ठेवतील का? हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.