जळगाव

Crime News | अमरावतीतील ट्रक चालक हत्येप्रकरणातील आरोपी रावेरमधून जेरबंद; पंजाबला पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत ट्रकच्या केबिनमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीला रावेर पोलिसांनी शनिवारी तात्काळ कारवाई करत अटक केली. आरोपी पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी अवघ्या एका अस्पष्ट छायाचित्राच्या आधारे शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८.४८ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आरोपी रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती दिली. त्यानंतर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८) असे असून तो रा. महमद, गाव मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर (पंजाब) येथील रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने आर्थिक कारणातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासह ट्रकला आग लावल्याची माहितीही समोर आली आहे.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाचा आयशर ट्रक (क्रमांक PB-02-EW-4299) जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीचा ताबा घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना झाले असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT