Father Son Drown Amalner
जळगाव : अमळनेर तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत दहा वर्षीय मुलगा आणि त्याचे वडील अशा दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खवशी गावातील अण्णा एकनाथ तलवारे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांचा दहा वर्षांचा मुलगा विरेंद्र हा तलावाजवळ गेला असताना अचानक पाण्यात पडला. पाण्यात बुडत असलेल्या मुलाला पाहून वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी तत्काळ तलावात धाव घेतली.
मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अण्णा तलवारे हेही तलावातील गाळात अडकले. त्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने बाप-लेकाला तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेल्याने खवशी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.