जळगाव : शासनाच्या घरगुती उपयोगी वस्तूंच्या संचावर डल्ला मारणाऱ्या आणि गरिबांकडून 'केवायसी'च्या नावाखाली वसुली करणाऱ्या कामगार मंडळातील महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजी नगर, जळगाव) असे या लाचखोर महिलेचे नाव आहे. चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील वाटप केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, केवळ १०० रुपयांची लाच घेताना पकडलेल्या या महिलेच्या टेबलाखालून तब्बल ४१,२५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचे संच वाटप केले जात आहेत. एका तक्रारदाराने यासाठी ९ एप्रिल रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. १५ एप्रिल रोजी संच घेण्यासाठी त्यांना चिंचोली येथे बोलावण्यात आले होते. तिथे गेल्यावर आरोपी आसमा शेख हिने "संच हवा असेल तर तुमची केवायसी करावी लागेल आणि त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील," असे सांगून अडवणूक केली.
वस्तूसाठी लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने थेट जळगाव एसीबी कार्यालय गाठले. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने सापळा रचला. चिंचोली येथील संच वाटप केंद्रावर तक्रारदाराकडून १०० रुपये स्वीकारताच आसमा शेख हिला झडप घालून पकडण्यात आले. कारवाईदरम्यान एसीबीला मोठे घबाड हाती लागले. आरोपी महिला ज्या टेबलावर बसली होती, त्याखाली असलेल्या एका पत्राच्या पेटीत ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचे पाकीट आढळले. हिशोब न लागलेली ही ४१,२५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, हा पैसा इतर लाभार्थ्यांकडून लुटलेला असल्याची दाट शक्यता आहे.
ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी रेश्मा अवतारे आणि त्यांच्या पथकाने केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.