जळगाव : जळगाव जिल्ह्यात पाकिस्तानातून आलेले एकूण 405 नागरिक वास्तव्य करत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांचा समावेश आहे.
यापैकी 327 नागरिकांना लॉंग टर्म व्हिसा (LTV) एक्सटेन्शन मिळाले आहे, दोन जणांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 12 नवीन नागरिक अलीकडेच भारतात आले आहेत. तसेच 12 जणांना LTV एक्सटेन्शन ऑन मंजूर करण्यात आले आहे.
नागरिकत्वासाठी व्हेरिफिकेशन प्रलंबित – 19 नागरिक
लॉंग टर्म व्हिसा (LTV) फाईल ट्रान्स्फर – 5 प्रकरणे
CAA अंतर्गत अर्ज – 27 नागरिक
दरम्यान, जम्मू कश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, याचे तीव्र पडसाद देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सिंधू जल वाटप करार तत्काळ स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. संवेदनशील पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर प्रशासनाचे लक्ष लागून आहे.