जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वितरित केला. या निमित्ताने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'पीएम किसान उत्सव दिवस' कार्यक्रमात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये मूल्यवर्धन आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या हप्ता वितरणाचा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जळगावात थेट प्रक्षेपित करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचा संदेश आल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, "जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या कापूस आणि केळी या पिकांमध्ये मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी १ ते ४ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत."
यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे सांगितले, तर आमदार सुरेश भोळे यांनी शेतकऱ्यांना २० वा हप्ता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली यांनी शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धनाचा अवलंब करून शेतीत स्थैर्य आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती यांनी योजनेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यातील प्रगत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शरद जाधव यांनी केले.