जळगाव

बालिका खूनप्रकरण : आरोपीला ताब्यात देण्यासाठी संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला

दिनेश चोरगे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा गावातील सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने चिंचखेडा शिवारात अत्याचार केला. त्यानंतर तिचा खून करुन त्याने पलायन केले होते. या नराधमाला गुरूवारी (दि.२०) भुसावळ येथून पोलिसांनी अटक केली. सुभाष इमाजी भिल ( वय ३५, रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर ) असे या नराधमाचे नाव आहे. त्याला अटक केल्याची माहिती मिळताच मोठा जमाव पोलिस ठाण्यासमोर आला. त्यानंतर या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, असे म्हणत तणाव निर्माण केला. तसेच जामनेर पोलिस ठाण्यावर हल्लाबोल करत पोलीस ठाण्याची तोडफोड केली. यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, केकत निंभोरा येथील सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेतील संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल हा नराधम घटनेच्या दिवसापासून फरारी होता त्याला आज (गुरुवारी) पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यात तापी नदीच्या जवळ असणाऱ्या एका भील वस्तीमधून ताब्यात घेतले. नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला. त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळत घटनेचा निषेध केला. तसेच पोलिस ठाण्यासमोर येत नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत ठाण्याची  तोडफोड केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक केली. त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती वरिष्ठांकडे गेल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला जामनेर शहरांमध्ये रवाना करण्यात आले. दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी हे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी सात ते आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेमध्ये निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी हितेश महाजन, कुंभार, सुनील राठोड, आर. एस.कुमावत, संजय खंडारे, प्रीतम बारकले आदी जखमी झाले. जखमी पोलिसांवर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT