file photo  
उत्तर महाराष्ट्र

जळगाव : हॉटेल मालकानेच केली वेटरची हत्या, तीन महिन्यानंतर प्रकरणाचा उलगडा

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अमळनेर येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आता पोलिसांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात नरेंद्र उर्फ भटु यशवंत चौधरी (रा. माळी वाडा) याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ हॉटेल असून मयत दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील यांचे कुटुंब सुरत येथे रहिवासाला असून, ते गेल्या १५ वर्षापासून अमळनेर येथे कुटुंबापासून वेगळे राहत होते. २२ एप्रिल रोजी दगडू पाटील हॉटेलजवळ खाली पडलेला आढळून आला होता. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. ६ मे रोजी त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर नरेंद्र चौधरी याने अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

असा झाला उलगडा…

वैद्यकीय अहवाल, दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनास्थळजवळील फुटेज तपासले. त्यात हॉटेल मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस कर्मचारी घनश्याम अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT