सिडको : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ही अमृताच्या थेंबांनी पवित्र झालेली महाकुंभाची भूमी आहे. या भूमीतून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांच्या कर्तृत्वाने नाशिकचेच नव्हे, तर देशाचे नाव जगात उज्ज्वल व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील द एसएसके वर्ल्ड क्लबच्या वतीने आयोजित यशोकीर्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, एसएसके वर्ल्डचे संचालक शैलेश कुटे, डॉ. राजश्री कुटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, इच्छा असेल, तर मार्ग निघतो असे म्हणतात. नाशिकमध्ये तयार झालेल्या द एसएसके वर्ल्ड क्लबसारखी सर्व सुविधायुक्त क्रीडासंकुले इतर राज्यांतही तयार होण्याची गरज असून, त्याचा फायदा खेळाडूंनी घेतला, तर देशाच्या सर्व भागांतून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार होतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी द एसएसके वर्ल्ड क्लबची पाहणी करून कौतुक केले. राज्यपालांच्या भाषणापूर्वी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक व क्रीडा धोरणांमुळे या क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला असून, त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागल्याचे सांगितले. स्वप्नील कुटे यांनी आभार मानले.
खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ : ना. भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यातील क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून, राज्यातील तालुका क्रीडा संकुलांना 5, जिल्हा क्रीडा संकुलांना 25, तर विभागीय क्रीडा संकुलांना 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचे धोरण शासनाने नुकतेच ठरवले आहे. त्यातून खेळाडूंना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच उद्योजक शैलेश कुटे यांनी या क्लबची स्थापना करून खेळाडूंना मोठे व्यासपीठ तयार करून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.