उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’, यंत्रणा लागली कामाला

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी (दि. १५) होत असलेल्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्त का होईना शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे मनपा प्रशासनाला जाग आली आहे. ज्या मार्गाने मंत्र्यांचा ताफा येणार आहे, ते रस्ते चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरासह गोदावरी स्वच्छतेचे कामही जोरात सुरू आहे. महापालिकेचा प्रत्येक विभाग या कामी जुंपला असून, या कार्यक्रमानिमित्त का होईना शहराचे रूपडे पालटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसाने मनपाच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे असून, यावरून प्रवास करताना वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी वारंवार तक्रारी करूनदेखील मनपा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. मात्र, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना रस्ते दुरुस्तीचे काम मनपाच्या बांधकाम विभागाने घेतले आहे. ओझरमार्गे मंत्र्यांचा ताफा शहरात दाखल होणार असल्याने, या मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम सध्या मनपाने हाती घेतले आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून यासाठी शहरभर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तसेच गोदावरी संवर्धन कक्षाकडून गोदावरी नदीतील पाणवेली काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकंदरीत डझनभर मंत्री शहरात येणार असल्याच्या निमित्ताने का होईना महापालिका प्रशासनाला शहर स्वच्छतेसह रस्ते दुरुस्तीची आठवण झाल्याची एकच चर्चा नाशिककरांमध्ये रंगत आहे.

बैठकांचा धडाका

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मनपा अधिकाऱ्यांकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जात आहे. बांधकाम, गोदावरी संवर्धन कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागासह अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा विभागावर विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

आरोग्य पथकांचे नियोजन

शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वैद्यकीय व्यवस्था पुरविता यावी यासाठी आरोग्य पथकांचे नियोजन केले जात आहे. मनपा आरोग्य अधिकाऱ्याची बदली झाल्याने, इतर प्रमुख अधिकाऱ्यांवर याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्राथमिक औषधोपचारासह रुग्णवाहिकाही कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पाणवेली काढण्याचे काम जोरात

गोदावरी नदी पुन्हा एकदा पाणवेलीने झाकून गेली असून, पाणवेली काढण्याचे काम जोरात सुरू आहे. तपोवन भागातील सरस्वती पुलाच्या खाली गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पाणवेलींनी आच्छादिले आहे. पुलावरून नजर टाकल्यास लॉन्स तयार झाल्याचे दिसून येते. ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास येऊ नये यासाठी मनपा प्रशासन कामाला लागले आहे.

लाभार्थ्यांची होणार पायपीट

शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाभार्थ्यांना आणले जाणार असून, त्यासाठी सिटीलिंक व परिवहन विभागाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या बसेसचा थांबा ईदगाह मैदानावर केल्याने तेथून डोंगरे वसतिगृहापर्यंत लाभार्थ्यांना पायपीट करीत यावे लागणार आहे. त्याव्यतिरिक्त रावसाहेब थोरात, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, बिटको कॉलेज याठिकाणीदेखील पार्किंगचे नियोजन केले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT